कुकडीच्या पाण्यासाठी आ. शिंदे यांचे उपोषण २०११

कुकडीचे हक्काचे पाणी कर्जतला मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी आमदार प्रा. राम शिंदे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरच ठाण मांडून आज उपोषण सुरू केले. पाण्यासह विविध मागण्या असलेला मोठा फलक घेऊन ठाण मांडलेल्या शिंदे यांनी या वेळी सर्वाचे लक्ष वेधून घेतले.
आमदार सुधाकर भालेराव, भरत गोगावले, गिरीश महाजन, बाळा भेगडे, चंद्रकांत मोकाटे यांच्यासह शिवसेना-भाजपचे २० ते २५ आमदार या वेळी उपस्थित होते. सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी शिंदे यांनी उपोषण सुरू केले. त्यामुळे सभागृहात जाणारा प्रत्येक मंत्री व आमदार थांबून फलक वाचत होता. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे यांनी फलक वाचून हसून दाद दिली. विशेष म्हणजे कुकडीचे कर्जतला मिळणारे पाणी अडविण्यात वळसे यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. मंत्री छगन भुजबळ, नारायण राणे, तसेच कृष्णा खोरे महामंडळाचे मंत्री रामराजे निंबाळकर यांनी या आंदोलनाची दखल घेतली. आमदार शिंदे यांनी निंबाळकर यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, नियमाप्रमाणे कुकडी धरणातील अतिरिक्त पाणी ‘टेल टू हेड’ असे प्रत्येक आवर्तनात द्यावे. या पाण्याचे प्रत्येक तालुक्यास क्षेत्रनिहाय समान वाटप व्हावे. कुकडीचे अतिरिक्त पाणी रुक्मिणी खिंडीद्वारे चोंडी कोल्हापूर बंधाऱ्यात सोडावे. भोसे खिंडीचे काम पूर्ण झाले असून चाचणी त्वरित घ्यावी आदी मागण्या त्यांनी केल्या. उन्हाळी आवर्तनाचे पाणी देण्याचा निर्णय होऊनही पाणी का दिले नाही? या बाबत दोषींवर कारवाई करावी. प्रत्येक वेळी कर्जत तालुक्यावर होणारा अन्याय दूर करावा. कुकडी चाऱ्या व उपचाऱ्यांसाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचे पैसे त्वरित द्यावेत या मागण्यांचाही त्यात समावेश आहे.
बातमी डाउनलोड करा .