कुकडीच्या पाण्यासाठी राजमार्ग रोखला

कुकडीचे भोसेखिंडीतून पिण्यासाठी आवर्तन सोडावे, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी तसेच भाजप-सेना कायकर्त्यांनी गुरुवारी नगर-सोलापूर महामार्गावरील मिरजगाव येथे तब्बल पाच तास रस्ता रोको आंदोलन केले.आमदार प्रा. राम शिंदे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. गेल्या तीन ते चार दिवसांपासून कर्जत तालुक्यात कुकडीचे पाणी होते. दूरगाव व थेरवडी तलाव भरुन झाल्यानंतर सीना धरणात शंभर द.ल. घ.फू. पाणी सोडू, असे आश्‍वासन पालकमंत्री,
जिल्हाधिकार्‍यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला देण्यात आले. जिल्हय़ाच्या दौर्‍यावर आलेल्या राज्यपालांनीही जिल्हाधिकार्‍यांना पाणी सोडण्याविषयी आदेश दिले होते. परंतु हे आदेश डावलून पाणी सीना धरणात न सोडता बंद करण्यात आले. त्यामुळे गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास संतप्त भाजप, सेना कार्यकर्त्यांनी मिरजगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. आम्हाला अटक करुन गुन्हे दाखल करा, परंतु सरकारी वाहनातूनच न्या, असा आग्रह धरला. तीन ते चार हजार आंदोलकांपुढे पोलिस हतबल झाले. याच दरम्यान आमदार शिंदे आंदोलनस्थळी आले. आंदोलन शांततेच्या मार्गानेच चालू द्या, जिल्हाधिकार्‍यांनी या भागाच्या
परिस्थितीचा अभ्यास करुन सीना धरणात ७५ द.ल. घ. फू. पाणी सोडण्याविषयीचा अहवाल सहा ऑगस्टला पाठविला होता. तरीही अहवालाची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. या भागावर सातत्याने अन्याय होत आहे, असे सांगून आ. शिंदे यांनी पालकमंत्र्यांना 'लक्ष्य' केले.यावेळी सेनेचे अमृत लिंगडे, गुलाब तनपुरे, भाजपचे डॉ. नितीन झरकर, हरिदास केदारी, काँग्रेसचे डॉ. महेंद्र चेडे, शिवाजी नवले, डॉ. दिगंबर पुराणे, अभंग
बोरुडे, प्रकाश भंडारी, कैलास बोराडे, नारायण घोडके, बाळासाहेब जगदाळे, भाऊ कांबळे, अजिनाथ गोरे,सुनील बावडकर, दादा जाधव, शहर प्रमुख संजय शेलार, दादा जाधव यांचीही भाषणे झाली.अतिरिक्त पोलिस अधीक्षक शाम घुगे यांनी आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन आंदोलकांशी चर्चा सुरु केली. तहसीलदार सुरेश थोरात यांनी उद्या मुंबईत मंत्रालयात बैठक आयोजित करुन येत्या दोन ते तीन दिवसात आवर्तन सोडण्याविषयी कार्यवाही केली जाईल, असे लेखी आश्‍वासन दिले. त्यानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. अन्यथा तीव्र आंदोलन आश्‍वासनानुसार कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही
आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी विजय पवार, रामा मुरकुटे, शंकर धतुरे, बाबु भंडारी, वसंत कटारिया, तुषार जाधव, छबुताई गुंजाळ, अमोल देशमाने, जावेद जमादार तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्तेमोठय़ा संख्येने हजर होते.सकाळी साडेदहा वाजता सुरु झालेले हे आंदोलन दुपारी साडेतीनच्या सुमारास संपले.